(राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोनाने महिलेचा मृत्यू झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील वारणी गावातील ग्रामस्थांनी दिव्यांग असलेल्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बीड मधील वारणी गावातील 55 वर्षीय सोनाबाई धोत्रे यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करून घरी आलेल्या धोत्रे कुटुंबाला मात्र गावकऱ्यांनी माणुसकी विरहित वागणूक देत वाळीत टाकल्यामुळे परिवार हादरला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार मयत सोनाबाई धोत्रे यांचे संपूर्ण कुटुंब दिव्यांग आहे. त्यामुळे सोनाबाई यांच्या आधारावर घराचा गुजारण होत होता. 11 मे रोजी सोनाबाई धोत्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, मात्र अंत्यसंस्कार करून गावात आल्यावर या दिव्यांग कुटुंबाला अक्षरशः गावाकडून घृणास्पद वागणूक मिळाल्याने धोत्रे कुटुंबीय मोठ्या संकटात सापडले आहेत.
अंत्यसंस्कार करून घराकडे आलेल्या या दिविंग कुटुंबाला गावात कोणी विचारपूसही केली नाही. शेजाऱ्यांनी पिण्यासाठी पाणीही दिले नाही. सोबतच त्यांना पाणीही मिळू न देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गावातील सार्वजनिक शाळेच्या हातपंपावरून पाणी आणण्याचा प्रयत्न केल्यावर नागरिकांनी या हातपंपाची अक्षरशः साखळी तोडून टाकली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून हा परिवार पाण्याशिवाय राहत होता. मदतीच्या अपेक्षेत असलेल्या परिवाराने शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करून ही माहीत दिली.
सदर कुटुंबातील सर्व व्यक्ती ह्या दिव्यांग असल्याने दुसऱ्यांच्या आधाराशिवाय कोणतेही काम करू शकत नाहीत. त्यामुळे बाहेरून पाणी आणण्यासाठी कुणीही मदत न केल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून हा परिवार पाण्याविना जगत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे . अखेर असह्य झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट यांना फोन करून बोलावल्यावर शिरसाट यांनी शेजाऱ्यांशी भांडण करून या परिवाराला पाणी मिळवून दिले. सोबतच तहसील प्रशासनाला याबाबत माहिती देऊन ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक हातपंप दुरुस्त करण्यात आला.
कोरोनाच्या काळात समाजामधली माणुसकी हरवत चालल्याचे विविध प्रकार समोर येत आहेत. एकमेकांच्या आधाराशिवाय सर्वसामान्य परिवारालाही जगणे मुश्किल होत असतांना या दिव्यांग परिवाराला वाळीत टाकल्यावर काय अवस्था निर्माण झाली असेल ह्याचा विचार करूनही मन हेलावून जाते.