जळगाव राजमुद्रा दर्पण । मालवाहू पिकअपने पानटपरीला धडक दिल्याने पानटपरी जमीनदोस्त झाल्याच्या नैराश्यात पानटपरी मालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे उघडकीस आली. पुनमचंद श्रावण बारी(वय ४०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत वृत्त असे की, शिरसोली प्र.न. येथील बसस्थानकाजवळ पुनमचंद बारी यांची लक्ष्मी पानटपरी आहेला. त्यांच्या या पानटपरीला १४ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजता एम.एच.२० ई.एल.७५८१ क्रमांकाच्या मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिली. यात पानटपरी जमीनदोस्त झाल्यामुळे पानटपरी मालक पुनमचंद बारी तणावात होते.
दरम्यान,मालवाहू पिकअप वाहन मालकाने पहिले सांगितले पानटपरीची नुकसान भरपाई देतो. नंतर दोन दिवसांनी मात्र पिकअप वाहन मालक नुकसान भरपाई देत नाही असे सांगितल्या नंतर पुनमचंद बारी यांना प्रचंड नैराश्य आले होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचे पानटपरी हेच एकमेव साधन होते. शेवटी पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२० वर्षांपासून ज्या पानटपरीवर पुनमचंद बारी यांचा उदरनिर्वाह होता. ती पानटपरी आता जमीनदोस्त झाली व आपल्यावर असलेले कर्ज कसे चुकवावे या चिन्तेने बारी यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातच बारी यांनी आज सकाळी ७:३० वाजता राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. बारी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ भाऊ, १ बहिण, आई – वडील असा परिवार आहे.