अमळनेर राजमुद्रा दर्पण । विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी डॉ. कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटरची देशभरात सुरुवात करण्यात आली आहे. डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन गुजरात यांच्यावतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट अंतर्गत देशभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील बी. बी. ठाकरे विद्यालय वावडे (ता अमळनेर), सर्वोदय हायस्कूल (किन्ही), श्री शारदा विद्यालय (दीपनगर), दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालय (सुनसगाव) यांचा समावेश आहे. या चार शाळांना देशातील नामवंत वैज्ञानिकांच्या हस्ते ऑनलाइन ॲफिलेशन सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.
ऑनलाइन आयोजित कार्यक्रमांमध्ये इंडियन प्लॅनेटोरियम सोसायटी (मुंबई) चे अध्यक्ष जे. जे. रावल, इस्रोचे एक्स सायंटिस्ट जयंत जोशी, एनसीआरटी नवी दिल्लीचे गणित विभागाचे प्रमुख टी. पी. शर्मा विज्ञान प्रसारचे वैज्ञानिक बी. के. त्यागी रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी, एनसीटीएसचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील एपीजेकेवायएसचे नॅशनल डायरेक्टर गजेंद्र जेपाला कलाम चिल्ड्रन सायन्टिस्ट सेंटरचे राष्ट्रीय डायरेक्टर भगवान भाई, नॅशनल प्रोजेक्ट ॲकॅडमीचे सेक्रेटरी सुनील वानखेडे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या या बालवयापासून कृतीयुक्त शिक्षण, प्रकल्पाधारित शिक्षण, मॉडेल मेकिंग आदींमध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने देशभरातील ५० शाळांमध्ये कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटर सुरू करण्यात आले.
या सेंटरला रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रयोगाचे साहित्य सेंटरला पुरविण्यात येणार आहे. सेंटरमध्ये विद्यार्थी स्वतः येऊन विज्ञानाचे विविध प्रयोग करून त्या मागील वैज्ञानिक कारण समजून घेणार आहे. या पन्नास शाळांमध्ये जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे.