पुणे राजमुद्रा दर्पण । ‘प्रहार’ मधून नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणेंच्या या टीकेला आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे कुठलाही तोटा होणार नसल्याचा दावाही गोऱ्हे यांनी केलाय.
हार की प्रहार? प्रहार मधील प्र कधीच निघून गेलाय. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं, असा खोचक टोलाही नीलम गोऱ्हे यांनी लगावलाय. त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे शुन्यही तोटा होणार नाही, असंही त्या म्हणाल्या. राणे यांनी समतोल राखून बोललं पाहिजे, असा इशाराही गोऱ्हे यांनी यावेळी दिलाय.
किरीट सोमय्या यांच्यावरही गोऱ्हेंनी खोचक टीका केलीय. सोमय्या हे कर्णबधिर आणि दृष्टीहीन आहेत. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करणार नाहीत. खासदार संजय राऊत यांनी जी भूमिका घेतली तीच माझी भूमिका आहे, असं त्या म्हणाल्या. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना महिला आयोगाला अध्यक्षपद मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, हे पद सर्वधर्म समभावाचं आहे. पक्षाची राजकीय भूमिका असते. मात्र, ती बाजूला ठेवून त्या काम करतील अशी आशा गोऱ्हे यांनी व्यक्त केलीय.
उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्याच दैनिक प्रहारमधून उत्तर दिलंय. सेना आणि राणे यांच्यातील राजकीय वादामुळे नारायण राणे यांनी हार आणि प्रहार या मथळ्याखाली थेट शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. हिंतम असेल तर अंगावर घ्या वेळ आणि तारीख सांगा असं थेट आव्हान राणेंनी दैनिक प्रहार मधून दिलंय. दैनिक प्रहारमधून नारायण राणें यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
हे म्हणतात, मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. आम्हाला माहिती आहे, कसे केले ते! शिवसैनिक साक्षीदार आहेत. संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे व आदित्यना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी शिवसैनिक नव्हता. आपण तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, ‘साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे.’ याला राऊत साहेबांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.’ त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचे सोडा. शिवसेना आता वाघ राहिलेली नाही. तिची मांजर, शेळी झाली आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.