नंदुरबार राजमुद्रा दर्पण । नंदुरबार येथे ड्रंक अँड ड्राईव्ह शोध मोहीम राबविली जात आहे. यात ४२ वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांचे लायसन्स देखील रद्द करण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून यात अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्याही वाढली असून यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४२ वाहनचालकांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून लायसन देखील रद्द करण्याची कारवाई सुरू आहे.
आगामी सण उत्सव काळात देखील जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशन अंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनात दारू पिऊन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिले आहे. मद्यपान करून वाहन चालवणे धोकेदायक आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी दारू पिऊन वाहन चालवू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.