मुंबई राजमुद्रा दर्पण । दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती, जी बाळासाहेबांची महाराष्ट्राबाहेर झालेली एकमेव सभा होती. त्यानंतर 22 वर्षांनी बाळासाहेबांचा नातू प्रचारसभा घेणार आहे. दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून खासदारकी मिळवलेल्या मोहन डेलकरांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. मोहन डेलकरांनी 9 वेळा निवडणूक लढवली, ते 7 वेळा खासदार राहिले. मोहन डेलकर यांचे वडीलही इथे खासदार होते. ते पोर्तुगिजांविरोधात लढले, असं हे कुटुंब आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत महेश गावित हे भाजपचे उमेदवार आहेत. 30 ऑक्टोबरला मतदान पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून आज सायंकाळी प्रचार संपणार आहे. या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीकडे महाराष्ट्राचंही लक्ष लागलं आहे. भाजप गड राखणार, की डेलकरांच्या पत्नी शिवसेनेला खासदारकी मिळवून देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.