जळगाव राजमुद्रा दर्पण । भुसावळ येथील हनुमान नगर परिसरातील बंद घर फोडत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज लांबवीला. हा प्रकार २७ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की, भूषण बाळकृष्ण वारके ( वय- 33, हनुमान नगर, भुसावळ) हे मार्केटींग व्यवसाय करतात. त्यांच्या शेजारी काका अशोक नामदेव वारके हे राहतात. 20 ऑक्टोबर रोजी ते मुलाला भेटण्यासाठी पुण्यात गेले होते. घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली. रात्री दोन वाजेच्या सुमारास वारके यांना जाग आल्यानंतर त्यांना काका अशोक वारके यांच्या घराजवळ एक संशयीत इसम उभा असल्याचे दिसल्याने त्यांनी पाठला केल्यानंतर संशयीत इसम पसार झाला.
दरवाज्याचा कडी-कोंडा तुटल्याचे दिसल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आला. चोरट्यांनी स्टीलच्या पेट्यांमध्ये ठेवलेली 17 हजारांची रोकड व एक हजार रुपये किंमतीचे चांदीचे नाणे लांबवल्याने या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश पाटील करीत आहेत.