चाळीसगाव राजमुद्रा दर्पण । तळोदा प्र चा ते पाथर्डे हा रस्ता सन २०१९\२०२० या वर्षी ३०५४ या योजनेतून मंजूर झाला होता, मात्र संबंधित ठेकेदाराने हा रस्ता अभियंता त्यांच्याशी संगनमत करून पूर्ण काम न करता अर्धवट सोडून पूर्ण बिल काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री गडाख यांचे कडून माहिती घेतली असता हा रस्ता पूर्ण झाला असून त्याचे बिल काढले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कामाची वर्क ऑर्डर व इस्टीमेट आमच्याकडे नाही असे उडवाउडवीची उत्तर दिले.
याबाबत तालुक्यातील तळोदा प्र चा येथील ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली असता मागील वर्षी रस्ता काम ठेकेदाराने केले फक्त बी बी एम करून खडीकरण केले नाही वरचेवर कच मारून थातुरमातुर काम केल्याचे म्हटले आहे. रस्त्याच्या कामाला कार्पेट व सिल कोट न करता जवळपास 10 लाख रुपयांचे बिल परस्पर काढून घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग मध्ये अंधाधुंद व मनमानी कारभार सुरू असून शाखा अभियंता ते उपविभागीय अभियंता यांना कामाची माहिती, वर्क ऑर्डर, इस्टीमेटची मागणी केल्यास आमच्याकडे नाही आपण जळगाव येथून घ्या अशी उत्तरे दिली जातात जर असे असेल तर लाखो रुपयांची बिले फक्त अंदाजे काढली जातात का असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुकाभरात अशी बोगस कामे झाली असून पूर्ण कामे न करता बरीच कामे अर्धवट सोडून बिले काढली गेल्याची चर्चा तालुकाभरात सुरू असून वरीष्ठ पातळीवर याची चौकशी होऊन संबंधित दोशींवर कारवाई करून सर्व कामांच्या रकमेची वसुली त्यांच्याकडून करावी अशी मागणी होत आहे.