धुळे राजमुद्रा दर्पण। लॉकडाऊनमुळे जवळपास वर्ष ते दीड वर्ष बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात मेहनतीने पिकवलेला शेतीमाल हा रस्त्यावर फेकून द्यावा लागत होता. परंतु, गेल्या वर्ष दीड वर्षानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्वकाही सुरळीत सुरू झाल्यानंतर बाजारपेठा देखील पुन्हा सुरू झाल्या. यामुळे शेतीमालाला चांगला भाव देखील मिळत आहे. अशातच शेतामध्ये आलेल्या पिकावर गोगलगायींचा हल्ल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महागडी औषधं फवारून देखील गोगलगाईवर कुठलाही परिणाम होत नसल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
साक्री तालुक्यातील उंबरे गावच्या शिवारामध्ये पाठीवर शंख असलेल्या गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्तम प्रतीचा भाव मिळत असलेल्या टोमॅटो पिकावर या गोगलगायींचा चांगलाच हल्लाबोल झाला. यामध्ये भाव असतांना देखील टोमॅटो पीक अक्षरश: उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. उंभरे येथील शेतकरी हिम्मत रामदास महाले यांच्या शेतात त्यांनी टोमॅटो, वांगी तसेच वालपापडी पिकांची लागवड केली आहे. परंतु शेती पिकावर गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्तम प्रतीचे आलेले पीक पूर्णतः खराब होत आहे.
शेतकरी या गोगलगायींच्या हल्ल्यामुळे चांगलेच संकटात सापडले आहे. अशा परिस्थितीमध्ये करावं तरी काय असा प्रश्न या शेतकर्यांसमोर उपस्थित झाला असून कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या या गोगलगाई संकटावर तोडगा काढून संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.