मुंबई राजमुद्रा दर्पण । महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर ईडी, आयकर विभाग अशा अनेक केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. केंद्रीय तपास संस्थांचा वापर करुन धमकापलं जात आहे. अशा पद्धतीनं तपास संस्थांचा वापर गैर आहे. अशाप्रकारे तपास संस्थांचा वापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या तपास यंत्रणांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी खोचक टीका चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केलीय.
एनसीबी इथल्या काही प्रमाणातल्या ड्रग्सवर कारवाई करते. पण गुजरातमध्ये 30 हजार कोटी रुपयांचं ड्रग्स सापडलं त्याची कुणीच चर्चा करत नाही. लसीकरणाबाबतही फक्त प्रसिद्धी केली जात आहे. पण जगात दोन डोस घेतलेल्यांच्या यादीत देश 144 व्या स्थानी आहे. भारतात फक्त 24 टक्के लोकांना डोस मिळाले आहेत. खोटी प्रसिद्धी देऊन अपयश लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही चव्हाण यांनी मोदी सरकारवर केलीय.
‘संस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुकूमशाही व्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे असे चित्र जगात निर्माण झाले आहे. पॅगेसीसच्या माध्यमातून हेरगिरी करून सर्वांची माहिती घेतली जात आहे, हे कोण करतेय याची चौकशी सरकार करत नाही. रशियातील केजीबीचा एक अधिकारी नंतर देशाचा पंतप्रधान झाला त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाला आणि आता आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष बनून रशियात एकाधिकारशाही आणली आहे भारताची वाटचालही रशियाच्या दिशेनेच सुरु आहे’, अशा शब्दात चव्हाण यांनी सप्टेंबरमध्ये मोदी सरकारवर हल्ला चढवला होता.