जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी निश्चित झाली असून, त्यांची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जागानिहाय उमेदवारांची यादी दोन दिवसांत जाहीर केली जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याने आता सर्वपक्षीय पॅनेलची शक्यता संपुष्टात आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीची पहिलीच बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृहात पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. आमच्याकडे प्रत्येक जागेवर दोन-तीन उमेदवार आहेत. कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यावी, यापेक्षा तिथे निवडून येणारा कोण, यावर मंथन सुरू आहे. जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला आहे. दोन दिवसांत त्यावर निर्णय होईल. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ. सतीष पाटील, जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष रोहिणी खडसे, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक संजय पवार आदी उपस्थित होते.