लखनौ राजमुद्रा दर्पण । उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर बहुजन समाज पक्षला (बसपा) मोठा झटका बसला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी आज शनिवारी समाजवादी पक्ष (सपा) मध्ये प्रवेश केला आहे. अखिलेश यादव यांनी सहा आमदारांना पक्षाचे सदस्यत्व दिले. हे आमदार बराच काळ अखिलेश यांच्या संपर्कात होते. त्याचवेळी भाजपच्या एका आमदारानेही सपाचे सदस्यत्व घेतले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी सपा हा भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभा आहे आणि मजबूत होताना दिसत आहे.
या सहा आमदारांची नावं आहेत- सुषमा पटेल मुंगरा (बादशाहपूर जौनपूर), हरगोविंद भार्गव सिधौली (सीतापूर), अस्लम चौधरी धौलाना (हापूर), अस्लम रैनी (श्रावस्ती), हकीम लाल बिंद (हंडिया प्रयागराज), मुजतबा सिद्दीकी (प्रतापपूर प्रयागराज). भाजपचे आमदार राकेश राठोडने देखील सपामध्ये प्रवेश घेतला.
यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, सपामध्ये येऊ इच्छिणारे अनेक लोक आहेत. निवडणुका येईपर्यंत भाजप हे ‘रनिंग फॅमिली’ राहील. या निवडणुकीत भाजपचा सफाया होण्याची खात्री आहे. त्यांनी भाजपचा जाहीरनामा वाचून दाखवला की, भाजपने शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ना त्याचे उत्पन्न दुप्पट झाले, ना त्याचे जीवन सुधारण्याचे प्रयत्न झाले, असं अखिलेश यांनी यूपीच्या भाजप सरकारवर टिका केली.
अखिलेश म्हणाले की, सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. भाजपचे लोक त्यांच्या जाहीरनाम्याची पानं उलटायला विसरतात. आत्तापर्यंत मुलांना लॅपटॉप आणि टॅबलेट देऊ शकले नाहीत. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांच्याबद्दल अखिलेश म्हणाले की, त्यांचा आदर केला जाईल आणि तोही आमच्यासोबत असेतील.