मुंबई राजमुद्रा दर्पण। भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी शेतकरी आत्महत्यांचे पाप डोक्यावर असताना राज्य सरकारने आता आणखी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे पाप डोक्यावर घेऊ नये, अशी विनंती केली. वेतन वेळेवर मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १९९९ नंतर राज्यात सलग पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हापासून राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाले होते. त्यासंदर्भात लाड यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुळात शेतकरी आत्महत्या हे देखील काँग्रेस-राष्ट्रवादीचेच पाप आहे. १९९९ नंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग झाले.
त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान खालावून त्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. एकीकडे नेत्यांची वाढती संपत्ती व दुसरीकडे नागरिकांची दुरवस्था हे जनतेच्या डोळ्यात येऊ नये म्हणून तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी विषारी जातीय प्रचार महाराष्ट्रात सुरु केला. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसटी तोट्यात गेल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे खासगी उद्योगसमूहांचा नफा गगनाला भिडत असताना, एकीकडे खासगी वाहतूकसेवा, मग त्या लक्झरी असोत वा ओला-उबेर असोत, वेगाने फोफावत असताना एसटी देखील चांगला नफा मिळवू शकते. मात्र सरकारलाच एसटी चालविण्याची इच्छाशक्ती नसल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. दूर डोंगरदऱ्यांमध्ये गावोगावी जाणारी एसटी बंद पडून चालणारच नाही. अशा स्थितीत निदान सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान द्यावे व कोणत्याही परिस्थितीत यापुढे कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, असे आवाहनही लाड यांनी केले आहे.