मुंबई राजमुद्रा दर्पण । अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे नुकसान सोसावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने अल्प मदत केली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर रोजी भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आंदोलनाची घोषणा केली. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नाही. या सरकारने राज्यातील शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. शेतकऱ्याच्या या संतापात सहभागी होऊन त्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळामुळे वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि पुढील किमान दहा वर्षे पुन्हा उभे राहता येणार नाही अशी अपरिमित हानी झाली. या शेतकऱ्यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजीही केली. पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच स्पष्ट झाले. मदत का मिळाली नाही याची माहिती घेतो, असे बोलघेवडे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले, पण मंत्रालयाकडे मात्र फिरकलेच नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यास न्याय मिळालाच नाही, असा दावा त्यांनी केला.
गेल्या दोन वर्षांत खंडणी वसुली आणि टक्केवारीपलीकडे जनहिताची कोणतीही योजना न आखणाऱ्या निष्क्रिय सरकारच्या निषेधार्थ काळ्या फिती लावण्यात येईल. हे कार्यकर्ते जागोजागी सरकारला जाब विचारतील. काळ्या कारभाराचे वाभाडे काढून जनतेसमोर सरकारचे स्वार्थी रूप उघड करतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.