(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
गेल्या काही वर्षापासून जळगाव शहरातील मनपा हद्दीत तयार करण्यात आलेले डांबरी आणि सिमेंट काँक्रीट रोड अगदी निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले असून त्याची सध्याची परिस्थिती ही फार दयनीय असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कामाच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात येऊन शासकीय परिपत्रकानुसार त्यांचे काम व्हावे, तसेच गुणवत्तेत घट करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर व अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात यावा. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे पत्रक सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी सादर केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा करण्यात येणाऱ्या कामाचा दर्जा कोणत्या योग्यतेचा असावा या संदर्भात महाराष्ट्र शासनाने या विषयाचे शासकीय परिपत्रक तयार केलेले आहे. त्यानुसार डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे आयुष्य किमान १५ वर्षे असावे, कॉंक्रीट रस्त्याचे आयुर्मान ३० वर्षे असावे तर पूल आदी घटकांचे आयुष्यमान कमाल १०० वर्षे असण्याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे. वरील मर्यादा येतील तसेच गुणवत्तेतील कामकाज नसल्यास संबंधित ठेकेदार तथा कामाशी संबंधित अधिकारी वर्गाला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्याची तरतूदही देण्यात आलेली आहे.
या विषयाला अनुसरून जळगाव शहरातील सार्वजनिक रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव १२ मे रोजी झालेल्या महासभेत देण्यात आला असून शिवाजीनगर परिसरातील कंक यांचे घर ते क्रांती चौक पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर झालेले आहे. मात्र या रस्त्याचे डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करण्यात यावे व शासकीय परिपत्रकाचे नियम पाळून हे काम करण्यात यावे अशी मागणी दीपक कुमार गुप्ता यांनी केली आहे.