मुंबई राजमुद्रा दर्पण | मंगळवारी मोठी कारवाई करत आयकर विभागाने राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा नरिमन पॉइंट येथील फ्लॅट जप्त केला आहे. अजोय मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार राहिले आहेत. आरोपानुसार, अजोय मेहता यांनी 1076 चौरस फुटांचा हा फ्लॅट शेल कंपनीच्या नावावर 5.33 कोटी रुपयांना विकत घेतला होता. या फ्लॅटची वास्तविक बाजारातील किंमत 10.62 कोटी रुपये आहे.
मेहतांच्या नरीमन पॉइंट येथील फ्लॅटसंबंधीत डीलवर आयकर विभाग बेनामी संपत्ती नुसार तपास करत होते. या वर्षी, मेहता यांना महारेराचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे, जे राज्य सरकारच्या वतीने मालमत्तेच्या तपशीलांची पडताळणी करतात. आयकर विभागाच्या बेनामी विभागाने या मालमत्तेचा खुलासा केला आहे.
नरिमन पॉइंट येथील या मालमत्तेचा व्यवहार शेल कंपनी आणि निवृत्त अधिकारी यांच्यात झाला होता. अनमित्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून शेल कंपनीच्या नावाने फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीचे दोन भागीदार मुंबईतील एका चाळीत राहत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. या शेल कंपनीसोबत केवळ या फ्लॅटचा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळेच आयकर विभागाला याबाबत संशय आला. तपासादरम्यान, त्याच्या बॅलेन्स शीटमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या आणि त्याचे नॉन-फायलर शेअरहोल्डर्स आढळून आले. यानंतर आयकर विभागाचे पथक या तपासात अडकले आणि ही मोठी चूक उघडकीस आली.