नागपूर राजमुद्रा दर्पण । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने सोमवारी मध्यरात्री अटक केली. देशमुख यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेत्यांना अटक करुन सरकार पाडता येईल, या गैरसमजात भाजपवाले आहेत. पण मला त्यांना सांगायचंय, तुम्ही कितीही प्रयत्न करा, महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“केंद्रातील भाजपचं सरकार सर्वच क्षेत्रात नापास झालंय. त्यामुळे या अपयशाला बगल देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातंय. ज्यांनी आरोप केले ते परमवीर सिंग गायब आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक, अजित पवारांसंबंधी संपत्तीच्या अफवा ही भाजपकडून मुद्दामून सगळं सुरु आहे. पण यामुळे सरकार आणखी मजबूत होईल” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं दुर्दैवी आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी विचारला.