जळगाव राजमुद्रा दर्पण। गेल्या वर्षी कोरोनाचे वातावरण असल्याने हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचे भीती कमी झाली असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. बाजारपेठेत सकाळपासून दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे तसेच नागरिकांकडून केरसुणी, लक्ष्मीच्या मूर्तीसह दिवाळीला फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी केले जात आहे. तसेच कपड्यांच्या दुकानातदेखील प्रचंड गर्दी होत असल्याने दीड वर्षानंतर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले.
दिवाळीच्या स्वागतासाठी विविध वस्तू आकर्षक झुंबर लाइटिंग, राजस्थानी पणत्या त्यासोबत दीप झुंबरला देखील पसंती आहे घराच्या पुढच्या पॅसेजमध्ये दिवे लावून घराची शोभा वाढविणाऱ्या झुंबर देखील अनेक प्रकार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी होत असल्याने हे दीप झुंबर दीडशे रुपयांपासून पुढच्या किंमतीत आहेत त्यात स्टार लाईट डायमंड दिवा ग्राहकांना आकर्षित करीत आहे. आता दिवाळीला सुरुवात झाली असल्याने आकाश कंदील व लाइटिंग खरेदीसाठी नागरिकांचा कल वाढला आहे.
शहरातील शिवतिर्थ मैदानाजवळ, फुले मार्केट, गांधी मार्केट, टॉवर चौक परिसरात रस्त्याच्या कडेला आकर्षक पणत्या विक्रीचे दुकाने दिसून येत आहे. चाकावर गोल फिरवून कुंभार बनवीत असलेल्या लाल मातीच्या साध्या पणत्या त्यासोबत आता राजस्थानी व वेगवेगळया कलाकृती आकर्षक वस्तूंची अधिक विक्री पाहण्यास मिळत आहे. कमळ, मोर, नारळ, ओम, स्वस्तिक, बदक वृंदावन कलर झुंबर 30 ते 40 प्रकारच्या डिझाईनच्या पणत्या शहरात विविध ठिकाणी विक्रीसाठी आहेत . राजस्थान गुजरात यासह कोलकत्ता ठिकाणाहून आयात केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.