(राजमुद्रा वृत्तसेवा)
मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून भाजपाने मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये असं आवाहन केलं आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही असं सांगत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
“मी छत्रपती शिवाजी महाजारांची, राजर्षी शाहू महाराजांची आणि समाजाची भूमिका मांडत असतो. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर गेल्या काही दिवसात राज्य आणि केंद्रात आरोप प्रत्योराप सुरु असून एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. कोणी ही राज्याची जबाबदारी तर कोणी केंद्राची जबाबदारी असल्याचं म्हणत आहे. मराठा समाजाला याच्याशी काही देणं घेणं नसून तुम्ही मार्ग काय काढून देणार आहात ते सांगा,” अशी विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
“मी समंजसपणाने भूमिका घेतली होती, त्याच्यावर शंका घेण्यात आली. माणसं जगली तर आऱक्षणासाठी लढू शकतो. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. २००७ पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. एवढा मोठा अलिशान वाडा असतानाही महिन्यातील चारच दिवस तिथे राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, दिशा देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.
“माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र फिरुन पुन्हा एकदा भावना समजून घेणार आहे. येत्या २७ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका मांडणार. पण यानिमित्ताने मला सर्व आमदार आणि खासदारांना सांगायचं आहे की, समाजाची भावना मांडल्यानंतर माझं तुझं केलं तर बघा,” असा प्रत्यक्ष इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. अजून मी आक्रमक झालेलो नाही, पण २७ तारखेला मराठा समाज काय करणार हे सर्वांना कळेल. पण तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहावं. आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
“मला आताच्याही मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की, तुमच्या हातात आहे ते करा ना…सुप्रीम कोर्टाने विरोधात निकाल दिला असला तरी सप्टेंबर २०२० च्या आधी असणाऱ्या नियुक्त्या करण्यास सांगितलं आहे. मग का थांबला आहात? सारथीसाठी एवढं लढलो मी…रस्त्यावर जाऊन बसलो. पण काय झालं त्यांचं?,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“मी मराठा समाजाला दिशा देण्यासाठी काम करत आहे. राज्य किंवा केंद्र सरकार असो एकमेकांवर ढकलाढकली करत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेला पत्र दिले. पण त्यांनी अद्याप मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही. पुन्हा एकदा मुद्दा मांडेन…समाजासाठी मी कुठेही आवाज उठवण्यास तयार आहे. मी कोणाला घाबरत नाही. २७ तारखेला सर्व समजून मी भूमिका मांडेन. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करेन…काही ठरत नसेल तर समाज आपली भूमिका स्पष्ट करेल आणि मी समाजासोबत आहे,” असं ते म्हणाले.