सोनगीर राजमुद्रा दर्पण । सोनगीर (ता. धुळे) ते बाभळे (ता. शिंदखेडा) शिवारातील जुन्या मुंबई- आग्रा महामार्गालगत शेतविहिरीत ४६ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवारी (ता. ३) दुपारी आढळला. त्याचा पत्नीसह प्रियकराने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिंदखेडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून निंबा रुपला पाटील (वय ४६, रा. सोनगीर) यांचा खून झाला असून, या प्रकरणी त्यांची पत्नी अनिता व प्रियकर शरद शालिग्राम पाटील (वय ४१, रा. सोनगीर) पोलिसांच्या ताब्यात आहेत.
दरम्यान, निंबा पाटील २१ ऑक्टोबरपासून कामाला जातो, असे सांगून घरातून निघाला. बारा दिवस झाले तरी तो परतला नाही म्हणून हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होती. तत्पूर्वी ४ ऑक्टोबरला त्याच्या पत्नीने पती मारहाण करतो, अशी फिर्याद दिली होती. संशयित शरद याने निंबा याचा खून करून मृतदेह धुळ्याचे संजय येवले यांच्या शेतविहिरीत फेकून दिला होता. विहिरीत पालथ्या स्थितीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती शिंदखेडा पोलिसांना मिळाली. अनेक दिवसांपासून मृतदेह पाण्यात असल्याने कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे विहिरीजवळ दुर्गंधी पसरली होती.
चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. संशयित शरद याने मृत निंबा याच्या हाताला ॲल्युमिनिअमची तार, पायाला दगडासह वायर बांधून विहिरीत फेकून दिले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी मृत निंबा याचे कपडे काढून केवळ बनियन व अंडरपॅंट राहू दिली गेली. बाजारात ॲल्युमिनिअमची तार विकत मिळत नाही. ती कशी आली? यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. हा धागा पोलिसांना संशयितांपर्यंत घेऊन गेला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार सदेसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील भाबड, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी गुन्ह्याचा तपास लावला.