लातुर राजमुद्रा दर्पण । एसटी महामंडळाचे शासनात विलीनिकरण करावे. या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला असून सातवा दिवस आहे. औसा येथून २ तर लातुरातून ५ बसेस मार्गस्थ झाल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश बसेस अद्यापही आगारात ठप्प झाले आहेत.
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी कामावर रुजू होण्याचे आदेश जारी केले. मात्र निलंगा, उदगीर, औसा, अहमदपूर आणि लातुर आगारात अद्यापही एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. यामुळे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर जिल्ह्यातील विविध आगारांना भेट देऊन कामावर रुजू होण्याच आवाहन करत आहेत.
बंद पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आता आगराच्या हद्दीत बसून आंदोलन करण्यास बंदी घातली असून औसा आगाराच्या समोर आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील हुसकावून लावले आहे. आगाराच्या रस्त्याच्याकडेला आंदोलकांनी ठाण मांडले आहे. जोपर्यंत शासनात विलीनिकरण होणार नाही; तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. तर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी कामावर रुजू व्हा; अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.