जालना राजमुद्रा दर्पण। राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत. मात्र, त्या आधीच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सत्तेचा फॉर्म्युला सांगितला आहे. आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी प्रत्येकी ५०-५० जागा जिंकून आणायच्या. मग सत्ता आपलीच आहे. भाजपला कधीच एवढ्या जागा जिंकता येणार नाही, असं गणितच अर्जुन खोतकर यांनी मांडलं आहे. त्यामुळे आघाडी खोतकरांचा हा फॉर्म्युला स्वीकारणार का? असा सवाल केला जात आहे.
दिवाळी निमित्त आयोजित स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवण्यात खंबीर आहेत. मी तुम्हाला विधानसभेचं एक सोपं गणित सांगतो. शिवसेनेने ५० जागा निवडून आणायच्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही प्रत्येकी ५० जागा निवडून आणायच्या. म्हणजे दीडशे जागा होतील. काय भेटणार यांना? ५०-५० जागा तर आपल्या कधीही निवडून येतात. भाजपवाले पावणे दोनशे जागा निवडून आणू शकतात का? आता तर पिसळून जात आहेत. ज्या होत्या त्याही जागा चालल्या आहेत. हे गणित लक्षात घ्या. तिन्ही पक्षांनी ५०-५० जागा आणल्या तर आम्ही पुन्हा येऊ म्हणणाऱ्यांनो सत्ता विसरून जा, तुमचा कधीच नंबर लागू शकणार नाही, असं खोतकर म्हणाले..