(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
खुनाच्या गंभीर आरोपातून निर्दोष मुक्तता मिळालेल्या आरोपीला आज (ता 20) पोलिसांनी गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसांसह बिग बाजार परिसरातून अटक करण्यात आली. आरोपी युनुस सलीम पटेल उर्फ सद्दाम पटेल (वय 30) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत बिग बाजार परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांना मिळाली. सदर माहिती मिळताच तात्काळ आपली सूत्रे फिरवत युनूस पटेल यांना सापळा रचून बिग बाजार परिसरातून अटक करण्यात आली. सदर इसमाची झडती घेतल्यावर आरोपीकडून 10,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले.
सदर आरोपीवर याआधी गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा दाखल असून या आरोपात त्याला अटक करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्यासह विजय निकम, अक्रम शेख, उमेश भांडारकर, गणेश पाटील, किशोर निकुंभ, रतन गीते, गणेश ठाकूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पो. ना. भास्कर ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. विजय निकुंभ व रतन गीते करत आहेत.