मुंबई राजमुद्रा दर्पण । अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेहुणीवर हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडेंची पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत.
हे ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘संगम’ या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होते. तिथूनच प्रायव्हेट आर्मी काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा असे अनेक जण येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरु होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. समीर वानखेडेंच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.