जळगाव राजमुद्रा दर्पण । शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन लागू करण्यासह महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जळगाव आगारातील कर्मचाऱ्यानी अचानक कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत काम न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याने येथून जाणाऱ्या बस सेवेवर परिणाम झाला असून, भाऊबीजनिमित्त गावी जाणाऱ्यांची गर्दी असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
दिवाळी उत्सव हा महामंडळासाठी गर्दीचा हंगाम मानला जातो. या दिवसात महामंडळाला मोठ्या प्रमाणा उत्पन्न मिळत असते. परंतु, या गर्दीच्या हंगामातच बससेवा बंद केल्याने उत्पन्न बुडत आहे. जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी आज दुपारनंतर अचानक कामबंद आंदोलन पुकारले आहे.
भाऊबीजेनिमित्त माहेरवाशिणींची गर्दी आहे. तर काही जण दिवाळीला गावी आले असताना आज रविवारनंतर सुटी संपणार असल्याने परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे बसला गर्दी आहे. अशा काळात कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी बससेवा बंद करणे म्हणजे प्रवाशी वेठीस धरण्याचा प्रकार झाला आहे.