मुंबई राजमुद्रा दर्पण । नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक सवाल केले आहेत. नोटबंदीमुळे देशात बेरोजगारी वाढली. अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्याचा दावा मलिक यांनी केला. नोटबंदीमुळे देशातून आंतकवाद, काळा पैसा संपला का? असे सवाल त्यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाद केल्या. पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी करत असल्याची जेव्हा घोषणा केली होती त्या भाषणात मोदींनी माझा हेतू चुकीचा वाटला तर मी चौकात उभा राहीन. देश जी शिक्षा करेल ती मी भोगेन, असे म्हटले होते. या पंतप्रधानांच्या घोषणेचा उल्लेख करत मलिक यांनी कुठे आहे तो चौक? असा सवाल केला. नोटबंदीमुळे काळा पैसा काही परत आला नाही. तसेच भ्रष्टाचारदेखील कमी झाला नाही. मोदीजी तुम्ही ३ महिने मागितले होते. आता त्यांनी सांगावे की आम्ही कोणत्या चौकात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.