पंढरपूर राजमुद्रा दर्पण । ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर तुमच्यासोबत आहे हे वचन मी देऊ इच्छितो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतला आहात, आपण काही राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. साहजिकच आहे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गेली अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊस, रस्त्यातील काटे खळगे यांचा विचार न करता आपली परंपरा जोपासणारे आपले वारकरी, त्याच्यातले अनेक साधूसंत यांच्या मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी कोणत्याही पावलावर राहून देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत राहू, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिल आहे.
वाखरी ते पंढरपूर हा महामार्गसुद्धा मोठा करण्याचा निर्णय घेतलात. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कारण सगळ्या नद्या तिकडे येतात आणि तिकडे मोठा भक्तिसागर होतो. भक्तिसागरऐवजी दुसरा शब्द मला तरी सूचत नाही. या पालखीचा थोडा अनुभव मी पायीसुद्धा घेतलेला आहे. आपण वेगळ्या दुनियेत राहतो, पण हा वारकरी समाज त्याच्या पलिकडे गेलेला आहे. त्यांच्याबरोबर थोडा चालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देहभान हरपून म्हणजे काय याचा प्रत्यय तिकडे येतो. पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहे.