(राजमुद्रा वृत्तसेवा)
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज मान्सून अंदमान निकोबार येथे दाखल झाला असून मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात (शुक्रवारपर्यंत) अंदमान बेटावर दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मान्सूनने आज अंदमान निकोबार बेटावर प्रवेश केला आहे. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करुन मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे १ जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर १० जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होईल. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.