मुंबई राजमुद्रा दर्पण। एसटी कामगारांचा संप मिटावा आणि कामगारांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मध्यस्थी करणार आहेत. राज ठाकरे थोड्याच वेळात शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे संपाचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यावर अजूनही तोडगा निघाला नाही. काल एसटी कर्मचाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. राज यांनी कामगारांच्या सर्व भावना समजून घेतल्या असून आज 5.30 वाजता शरद पवार यांची भेट घेऊन कामगारांची कैफियत मांडणार आहेत. त्यामुळे शरद पवार राज यांना काय आश्वासन देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एसटी कामगारांनी राज ठाकरे यांच्याकडे कायदेशीर बाबी मांडून त्यांच्या मागण्याही सांगितल्या. सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा सांगितलं. त्यावर राज यांनी कामगारांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. मी तुमचं नेतृत्व करेल. तुमच्यासाठी सरकारशी चर्चा करेल. मात्र तुम्ही आत्महत्या करू नका, असं आवाहन राज यांनी केलं होतं. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधला होता. राज ठाकरे ताबडतोब सरकारशी बोलणार आहेत. ते स्वत: जातीनिशी लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार आहेत. एकदा सरकारशी बोलणं झालं की मग कामगारांशी बोलेन असं आश्वासन राज यांनी दिलं आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं. कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला लढाई लढायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद हवी. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचं नाही. मनसे या लढाईत सोबत राहील, असं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील, असंही नांदगावकर यांनी सांगितलं होतं.