औरंगाबाद राजमुद्रा दर्पण । महागाईविरोधात शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा विशाल मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात येत आहे. शेकडो शिवसेना कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहे. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून याकरिता केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महागाईच्या विरोधात आम्ही चलो दिल्ली अशी हाक दिली आहे. या आंदोलनाचा प्रसार संपूर्ण देशात होणार आहे. मराठवाड्यात फक्त या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. आता हे लोण संपूर्ण देशभर पसरेल. देशातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करण्याच्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.
संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भूमरे यांचीही उपस्थिती दिसून आली. यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून औरंगाबाद शहरात या मोर्चाचे आयोजन केले जात आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेने शहरात या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती.