(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
ऊमाळा-नशिराबाद रोड जवळच्या परिसरात विविध कंपन्यांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हा वीज पुरवठा खंडित होण्याबाबत महावितरणकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नसून प्रशासनाचा या समस्येकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशन तर्फे लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.
सदर परिसरात बऱ्याच व्यावसायिक कंपन्या असून या भागातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असतो. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याने उद्योजक हैराण झाले आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्यास संदर्भात शासनाकडून चिंचोली येथील फिटरच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष पालकमंत्र्यांनी भ्रमणध्वनीवरून याबाबत सूचना केल्यानंतरही या कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने समस्या कमी होण्याऐवजी वाढत जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेवरूनही वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या सुटत नसल्याने कंपनी मालक व कर्मचारी वर्ग हतबल झाले आहेत.
आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रत्यक्ष भेटून जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशन तर्फे लेखी निवेदन देऊन या समस्येवर तोडगा काढण्यास संदर्भात विनंती करण्यात आली.