भडगाव राजमुद्रा दर्पण । गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहे. पहिले आवर्तन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे. येत्या २२ तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरला या पाण्याचा लाभ मिळण्याचे चित्र दिसून येत आहे.
गिरणा धरणात सध्या १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त जलसाठा आहे. रब्बीसाठी एका आवर्तनाला साधारण २ हजार ६०० दशलक्ष घनफूट एवढे पाणी लागते. त्यामुळे तीन आवर्तनांना साधारण साडेसात हजार दशलक्ष घनफूट पाणी लागण्याची शक्यता आहे. गिरणा धरणावर एकूण ६९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, पाटचाऱ्यांची दुरवस्था पाहता साधारण २५ हजार हेक्टरपर्यंतच पाणी पोहोचते.
यंदा खरीप हंगाम चांगला बहरला होता. मात्र अतिवृष्टीने खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कापसावरही बोंडअडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पूर्व हंगाम कपाशी लागवडीसाठी गिरणा धरणातून मे महिन्यात किमान एक आवर्तन मिळायला हवे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.