मुंबई राजमुद्रा दर्पण । आपल्या घरातील मंगल कार्याची पहिली पत्रीका ही कुलदैवतेच्या गाभार्यात ठेऊन करतो. हे आलप्या सर्वांना माहित आहेच. तसेच आपला पक्ष हेच आपले कुळ आणि याचे संस्थापक अर्थात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच कुलदैवत असे मानणारे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव विक्रम यांच्या विवाहाची पहिली पत्रीका ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर अर्पण करून आपली अनोखी दैवतनिष्ठा दाखवून दिली आहे.
बाळासाहेबांचा महानिर्वाण दिन. यानिमित्त मोट्या प्रमाणात शिवसैनिक शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर असणार्या त्यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. ना. गुलाबराव पाटील हे देखील शिवतीर्थावर अभिवादन करण्यासाठी जातात. या अनुषंगाने आज शिवतीर्थावरील स्मारकावर माथा टेकवतांना त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या विवाहाची पहिली पत्रीका बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विभाग प्रमुख विलास चौधरी यांच्यासह आदी जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती.
ना. गुलाबराव पाटील यांनी आधी सुध्दा आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रमाण मानून वाटचाल करत असल्याचे सांगितले आहे. शिवसेनाप्रमुखांचा जाज्वल्य विचार प्रमाणभूत मानून आणि विशेष करून त्यांचा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मूलमंत्र अंगीकारत एक नेता, एक विचार आणि एक झेंडा हाती धरत पक्षाचा सच्चा सैनिक म्हणून काम करत असल्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. आपल्या नेत्याच्या स्मारकाच्या चरणी आपल्या पुत्राच्या विवाहाची पत्रीका अर्पण करून त्यांनी आपली दैवतनिष्ठा अनोख्या पध्दतीत व्यक्त केली आहे.