जळगाव राजमुद्रा दर्पण । पाझर तलावातून अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या नावे बनावट वाळूच्या पावत्या बनवून शासनाची फसवणूक केली होती. या प्रकरणी चार तालुक्यांत अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ पंकज आशिया यांनी दिले.
अवैध गौण खनिज प्रकरणात बोगस पावत्यांसाठी राजमुद्रेचा गैरवापर झाल्याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांचा पाठपुरावा सुरू होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत १५ नोव्हेंबरला सबंधित कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून व्याजासह रक्कम वसूल करण्याचे आदेश काढले आहेत. तर डेप्युटी इंजिनिअरवरील कारवाईबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तसेच ज्युनिअर इंजिनिअर, शाखा अभियंता यांना नोटीस बजावून याबाबत खुलासे देण्याचे देश दिले. गौण खनिज प्रकरणात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखलचे आदेश २५ नोव्हेंबर २०२० ला तत्कालीन सीईओ डॉ. पाटील यांना काढले होते. परंतु त्या वेळी टाळाटाळ झाली होती. यानंतर आता वर्षभरानंतर गुन्हे दाखलचे आदेश काढले आहेत.
सर्व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सीईओंनी दिले. याच प्रकरणात तीन डेप्युटी इंजिनिअर, एक ज्युनिअर इंजिनिअर व पाच शाखा अभियंताचा समावेश आहेत. तर यामध्ये एका निवृत्त अभियंत्याचाही समावेश आहे. या अभियंत्यांविरोधातही गुन्हे दाखल होणार आहे.