मुंबई राजमुद्रा दर्पण । मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी (ता. १८) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निर्मला सामंत यांच्या प्रवेशाने पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत अधिक बळकटी मिळेल असा, विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या मान्यतेने निर्मला सामंत यांची मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली आहे.
जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मावळमधील युवा नेते देवाभाऊ गायकवाड नाणे यांच्यासह भाजपमधील अनेकांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी साथ लाभली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्याचे चित्र पालटले. सुनील शेळके यांना लाभलेला जनाशीर्वाद हा इतका मोठा आहे की आता कोणीही तिथे आपला प्रभाव दाखवू शकत नाही. आजचा होणारा पक्षप्रवेश हा लोकांच्या या पाठबळाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.