नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । केंद्र सरकारचा तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. शेतकऱ्यांचा एक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष फळाला आला. आता भाजपचा पराजयच देशाचा विजय असेल, असा जोरदार घणाघात त्यांनी केला. केंद्र सरकारने मोठ्या उत्साहात कृषी कायदे लागू केले. राजकीय विरोधासोबतच शेतकऱ्यांनीही आंदोलनाचे हत्यार उपसले. चर्चा ते दडपशाही सारे मार्ग अवलंबल्यानंतर अखेर हे कृषी कायदे मागे घ्यावे लागले.
सुरजेवाला म्हणाले की, शेतकऱ्यांनी काळ्या कृषी कायद्यांविरोधात मोदी सरकारविरोधात याचिका दाखल केल्या. मात्र, सरकारडून फक्त यातना मिळाल्या. मोदी सरकारने शेतकऱ्यांना लाठीहल्ला करायला लावला. दिल्लीच्या सीमा खोदून ठेवल्या. शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देण्यात आले. कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत 700 शेतकरी शहीद झाल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील लखीपूर खीरी येथे गृहराज्य मंत्र्याच्या मुलाने आपल्या मित्रांसोबत मिळून शेतकऱ्यांना गाडीने चिरडले. हे अतिशय भयंकर होते. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेऊन आज आपला गुन्हा कबूल केला आहे. आता मोदी सरकारला काय शिक्षा द्यायची, हे ठरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली.