(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
जळगाव शहरा नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील न्यायाधीन बंदी रूमजवळील स्वच्छतागृहाच्या छतावर चक्क एका गावठी पिस्तुलसह चार जीवंत काडतूस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ज्या रूग्णालयात इंजेक्शन, सिरिंज सापडायला हव्यात त्या ठिकाणी गावठी पिस्तुल मिळून आल्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.
जळगाव खुर्द येथे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर कारागृहातील न्यायाधीन बंदींसाठी उपचारासाठी खोली आहे. या खोलीच्या शेजारी असलेल्या स्वच्छतागृहाच्या छतावर कुणीतरी गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस लपविल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला. सायंकाळी रुग्णालयातील कर्मचारी स्वच्छतागृहात गेला असता त्यांच्या प्रकार लक्षात आल्याने लागलीच याबाबत पोलिसांना कळविले.
नशिराबाद पोलीस ठाण्याचे बशीर शेख, राजेंद्र साळुंखे, प्रवीण ढाके, शिवा चौधरी यांनी रूग्णालयात जावून पिस्तुल व काडतूस ताब्यात घेऊन रूग्णालयातील इतर विभागांचीही पाहणी केली. त्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.