जळगाव राजमुद्रा दर्पण । संविधान जागर समितीतर्फे आज संविधान दिनाचे औचित्य साधून शहरातील रेल्वे स्थानका जवळ असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना समतेचा आणि समान न्यायाचा अधिकार दिला. यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाने आखून दिलेल्या विचारांवरून चालण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री सुनील महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, माजी महापौर सीमा भोळे, मुकुंद सपकाळे, फारूक शेख, माजी उपमहापौर करीम सालार, राष्ट्रवादीचे एजाज मलीक, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, अमोल कोल्हे, माजी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, संविधान म्हणजे फक्त पुस्तक नाही. तर देशातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी याची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस चाललेला हा संघर्ष संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केले. सर्वांना न्याय देण्याचे काम संविधानाने केले आहे. आम्ही ओबीसी नसतो तर आज या व्यासपीठावर नसतो. अलीकडच्या काळात संविधानाला धक्का लावण्याची भाषा केली जाते, मात्र देशातील दलीत, ओबीसी, आदिवासी आदींच्या एकत्रीत संख्येमुळे असे काहीही शक्य नाही. ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आजही संविधानाच्या नियमाच्या बाहेर कुणाला जात येत नाही. आम्ही गाडीत बसलो असलो तरी या गाडीचे स्टीअरिंग हे बाबासाहेबांच्या (संविधानात) हातात आहे. आता अनेक जण गणपती पाण्यात बुडवून सत्ता बदल होण्याची अपेक्षा करत असले तरी तसे होणार नसल्याचा टोला देखील त्यांनी मारला. तर, संविधान दिनाच्या दिवशी आपण सर्वांनी संविधानाच्या मार्गावरून चालण्याची तसेच कोणत्याही बाबीची पडताळणी केल्याशिवाय याला सत्य न मानण्याचा संकल्प घेतला पाहिजे असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.