मुंबई राजमुद्रा दर्पण। ज्वलंत आणि हृदयाला भिडणाऱ्या कथांवर चित्रपट बनत असल्याचं जगजाहीर आहे. या कारणामुळेच मराठी चित्रपट नेहमीच जगभरातील आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारताना पहायला मिळतात. याच वाटेने जात देश-विदेशातील जाणकार प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळवणारा ‘फास’ हा आगामी मराठी चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सातत्याने वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
फ्रान्समध्ये झालेल्या ‘कान’ चित्रपट महोत्सवामध्ये स्क्रिनिंग झालेल्या ‘फास’चं जापान आणि पॅरिससारख्या देशांसह राजस्थान व नोएडासारख्या बऱ्याच ठिकाणी आयोजित होणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक करण्यात आलं आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. समाजाभिमुख कथानक आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचं नैसर्गिक सादरीकरण या ‘फास’च्या मुख्य जमेच्या बाजू आहेत. याला प्रसंगानुरूप गीत-संगीताची जोड देत चित्रपटाच्या कथेत मांडण्यात आलेला विषय प्रेक्षकांच्या मनापर्यंत अचूकपणे पोहोचवण्याचं काम करण्यात आलं आहे.