आता एसटी कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन
“एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे” या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रभर दुखवटा आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धुळे आगारामध्ये उद्या (दि.2) रोजी एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
सकाळी ७ ते दुपारी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. एक दिवसासाठी हे आंदोलन असून या आंदोलनाची दखल घेऊन मागणीवर सकारात्मक विचार न झाल्यास पुढील आठवड्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असे कर्मचाऱ्यांनी जाहीर केले आहे.
या आंदोलनामध्ये ज्या कर्मचारी बंधू-भगिनींना अन्नत्याग करून सहभाग घ्यायचा असेल त्यांनी गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत धुळे आगारात हजर रहावे, मागण्यांच्या घोषणा देऊन आंदोलनाला सुरूवात होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.