धुळे राजमुद्रा दर्पण l धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा राजवर्धन कदमबांडे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी शहादा येथील दीपक पाटील यांची निवड झाली. एकंदरीत अध्यक्षपद धुळे जिल्ह्याला तर उपाध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्याला मिळाले. निवडीची घोषणा होताच समर्थक संचालकांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.
निवडणुकीदरम्यान, बँकेचे अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रा. शरद पाटील यांनी विरोधी उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांच्याबाबत हरकत घेतली. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पंधरा वर्षांहून अधिक काळ राहता येत नाही. त्यामुळे कदमबांडे यांचा अर्ज रद्द करावा. यावर निवडणूक निर्णय अधिकारी देशपांडे यांनी प्रा. पाटील यांची हरकत फेटाळली.
जिल्हा बँकेच्या संचालकांच्या 17 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली होती. त्यानंतर आज सकाळी अकराला अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व 17 संचालक उपस्थित होते. त्यात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे संचालक राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील, भगवान पाटील, प्रभाकरराव चव्हाण, भरत माळी, हर्षवर्धन दहिते, राजेंद्र देसले, अमरसिंग गावित, लिलाबाई पाटील, सीमाताई रंधे, शामकांत सनेर, दर्यावगिर महंत हे 12 तर, विरोधी गटाचे चंद्रकांत रघुवंशी, प्रा. शरद पाटील, आमदार आमशा पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक व संदीप साळवे हे पाच संचालक उपस्थित होते.
सत्ताधारी गटातर्फे अध्यक्षपदासाठी श्री.कदमबांडे तर विरोधी गटातर्फे प्रा. पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटातर्फे दीपक पाटील व विरोधी गटातर्फे आमशा पाडवी यांनी अर्ज दाखल केले. यात सत्ताधारी गटाचे श्री. कदमबांडे व दीपक पाटील यांना प्रत्येकी 12 तर प्राध्यापक पाटील व आमशा पाडवी यांना प्रत्येकी पाच मते मिळाली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कथा जिल्हा उपनिबंधक देशपांडे यांनी अध्यक्षपदी राजवर्धन कदमबांडे यांचे तर उपाध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, बँकेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक करून बँकेला ‘अ’ वर्ग मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली.