या जगात सात अब्जाहून अधिक लोक राहतात. यातील बहुतेक लोक उपजतच आपल्या अंतरी असलेल्या अध्यात्मिक गुणांकडे लक्ष न देता ते आपले जीवन भौतिक जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी निरर्थक घालवतात. या जगात काही प्रमाणात असेही लोक आहेत की, जे जीवन जगण्याचा खरा उद्देश काय आहे व परमात्मा व आपल्यात नेमका काय संबंध आहे, हे जाणून घेण्याच्या मार्गावर ते मार्गक्रमण करत असतात.
जेव्हा आपण अशा लोकांना पाहतो ज्यांना ईश्वराला जाणून घ्यायची इच्छा आहे. ज्या लोकांचे ध्यान या भौतिक संसारात केंद्रित होतं, त्यांना असे वाटते की आपण आपला समाज आणि संस्कृती पासुन दूर होत आहोत, परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर असं काहीच होत नाही उलट ते त्यांच्या जीवनातील ध्येयाच्या प्रति पूर्ण समर्पित असतात. जे लोक परमेश्वराच्या शोधात आहेत, त्यामधील काही लोक असे असतात जे परमेश्वराला शोधण्यासाठी मोठ्या उत्साहाने लागतात, परंतु हळूहळू त्यांची आतूरता कमी होत जाते आणि ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा ध्येय प्राप्त करू शकत नाहीत.
जर आपण आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीकडे कटाक्षाने बघितले तर आपल्या लक्षात येईल की आपण नेहमी हाच विचार करतो की लोक आपल्याबद्दल काय विचार करतात? त्यांना आपलं वागणं, बोलणं, काम करणं समजतं की नाही? आपण आपले जीवन दुसऱ्याचा दृष्टीकोण लक्षात ठेऊन जगत असतो. खरंतर आपण त्याची निंदा सुद्धा करत असतो. आपण केलेली निंदा, टीका आपल्याकडे अधिक प्रमाणात परत येते, व आपण केलेली समोरच्याची प्रशंसा, कौतुक आपल्याकडे अधिक प्रमाणात परत येतात. हे सर्व करून जर आपण आपले जीवन व्यतीत केले तर आपल्याला कळत की शेवटी आपल्या हाती काहीच लागत नाही.
यापेक्षा आपल्याला एक संतुलित जीवन जगण्याची गरज आहे. संतुलित जीवन जगण्यासाठी आपल्याला दुसऱ्याचं नेहमी भलं होवो ही भावना मनात ठेवली पाहिजे, दुसऱ्या बद्दल सदैव चांगला विचार केला पाहिजे. हे करत असताना परमेश्वरावर आपली श्रद्धा व विश्वास इतका मजबूत हवा की तो कोणी तोडू शकणार नाही. आपण नेहमीच भयमुक्त जीवन जगले पाहिजे, म्हणजेच आपल्या अंतरंगात इतका विश्वास पाहिजे की परमेश्वर सदैव आपल्या सोबतच आहे आणि तोच आपल्याला सांभाळतो आहे. कुणी सुंदर असो किंवा कुणी कुरूप असो सर्वांना एकाच दृष्टीने बघितले पाहिजे. तेव्हाच आपण परमेश्वराच्या ज्योतिचे दर्शन करू शकतो आणि तेव्हाच आपण आपल्या जीवनाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. ते ध्येय म्हणजे, आपण स्वतःला ओळखणे व परमेश्वराला प्राप्त करणे.