जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत भवन येथे संविधान जागर समिती व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही भारताचे लोक” या विषयावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक, विचारवंत पत्रकार उत्तम कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
“मी पणाने राष्ट्र तयार होत नाही, राष्ट्र आम्ही म्हणूनच तयार होत असते”. ज्या दिवशी जाती जन्माला आल्या त्या दिवशी राष्ट्र मरण पावले. जाती मुळेच मी पणा वाढीस लागतो म्हणून आम्ही भारताचे लोक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार हिच देशाची खरी ताकद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दैववादाला पराभूत केले आहे. मात्र संविधानाला हळद-कुंकू लावून दैवीकरण करण्याचा प्रयत्न अज्ञानातुनच केला जातो. मानवी कल्याण सांगणाऱ्या संविधाना बाबत साक्षरता होण्याची गरज आहे असे परखड विचार श्री. उत्तम कांबळे यांनी व्याख्यानातुन व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकूंद सपकाळे यांनी केले. विचार मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंतीताई दिघे, प्रा.मिलिंद बागुल, अमोल कोल्हे, ईश्वर मोरे, किशोर सूर्यवंशी, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे, भारत ससाणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे बापूराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदन बिऱ्हाडे, जगदीश सपकाळे, महेंद्र केदारे, वाल्मिक सपकाळे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, आकाश सपकाळे, बाबुराव वाघ, युवराज सुरवाडे आदिंनी परिश्रम घेतले.