(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
जळगाव शहरातील निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या मेहरुन तलाव परिसरात स्थानिक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा निचरा होण्या संदर्भात समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबतची माहिती वृत्तपत्रांमध्ये झळकल्यावर महापौर जयश्री महाजन तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी तलावाची तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली.
या परिसरातील नागरिकांच्या, पाण्याचा निचरा होण्यास संदर्भात तसेच निसर्गरम्य परिसरातील झाडांची होणारी हानी, सायंकाळनंतर मद्यपींचा होणारा त्रास तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे परिसरात निर्माण होणारा कोलाहल यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. या समस्या लक्षात घेऊन सदर परिसरामध्ये लवकरात लवकर उपाययोजना नेमून परिसरात निसर्गाची हानी रोखण्यासंदर्भात नागरिकांकडून विनंती करण्यात आली. या कामांमध्ये महापालिकेला स्थानिक नागरिकांचा निधी जमा करून देण्याचाही विचार रहिवाशांनी दर्शवला. सोबतच या परिसरात अंकुश ठेवण्यासाठी वॉचमन नेमून परिसरावर पाहणी करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली.
मेहरूण तलावात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडण्यात येत असल्याने तलावाचे पाणी अशुद्ध होण्याच्या मार्गावर असून यासंदर्भात लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी संगितले. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नागरिकांच्या सर्व समस्या सोडवल्या जाऊन हा परिसर पुन्हा सुशोभित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.