नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून मिळते. मात्र ज्यावेळी एखाद्या कुटुंबाचे दुसऱ्या राज्यात स्थलांतर होते. अशावेळी त्याला स्वस्त धान्य मिळण्यास अडचणी येतात. नेमक्या याच अडचणी आता माझे रेशन या अॅपच्या माध्यमातून दूर होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली. माझे रेशन अॅप हे नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
माझे रेशन अॅपच्या मदतीने तुम्ही नव्या रेशन कार्डसाठी नोंदणी करू शकता, नवे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता. तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते देखील पाहू शकता. आधार जर लिंक नसेल तर तुम्ही स्व:ता तुमचे आधार अॅपचा वापर करून रेशन कार्डला जोडू शकता. यासोबतच आतापर्यंत तुम्हाला किती धान्य वितरीत करण्य़ात आले आहे, तुमच्या जवळ कुठे-कुठे स्वस्त धान्य दुकान आहे? याची माहिती देखील तुम्हाला मिळू शकते.
रेशन कार्ड काढायचे झाल्यास किंवा त्याची नोंदणी करायची झाल्यास मोठ्याप्रमाणात कागदपत्रे सादर करावे लागत होते. तसेच त्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागत होते. मात्र आता तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटांमध्ये कमीत कमी कागदपत्रांमध्ये नोंदणी करू शकणार आहात. तसेच रेशन कार्ड तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागत होता. मात्र आता या अॅपमधूनच ते डाऊनलोड होणार असल्याने वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. सोबतच तुम्ही जर इतर राज्यात स्थलांतर केले तर, या अॅपवर स्थलांतरणाचा देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.