नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । शिवसेना नेते संजय राऊत यांनी वापरलेल्या एका शब्दाला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपने केली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत आपल्या शब्दावर कायम आहेत. मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. तो शब्द योग्यच आहे. काय तक्रार करायची ती करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.
हे अशिक्षित अडाणी लोकं आहेत. ते हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात. पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश उघडले, पाहिले, चाळले तर मी वापरलेला शब्द असंसदीय नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख, पढत मूर्ख, शतमूर्ख असाच आहे. पण हे लोक ते समजून घेत नाहीत, असा चिमटा राऊतांनी काढला.
महाराष्ट्राला संस्कार आणि संस्कृतीची परंपरा आहे. तुम्ही शिकलं पाहिजे. शिकाल तर मोठे व्हाल. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा हा शब्द वापरला आहे. त्यांचे पंधरा ट्विट दाखवेन. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे हा शब्द वापरला आहे. भाजपच्या उत्तर प्रदेशातील अनेक नेत्यांनी हा शब्द वापरला आहे. कारण तिथला ग्रामीण भागातील तो शब्द आहे. आम्ही इथे वापरला. मी दिल्लीत आहे. महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात असतो तर कदाचित हा शब्द नसता वापरला. पण इथली ती बोलीभाषा आहे. त्यामुळे सर्वांना समजेल उमजेल असा शब्द वापरला. तो शब्द योग्यच आहे. कुणाला काही तक्रार करायच्या असतील तर कराव्यात. माझी काही अडचण नाही. पण त्यांनी शब्दकोश चाळावेत. नसतील तर त्यांना शब्दकोश पाठवून देईन, असा टोलाही त्यांनी हाणला.