मनवेल ता.यावल : सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था साकळी संचलित, श्री संत गजानन महाराज फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित साकळी ते शेगाव वारीचे आयोजन आज दि.६ रोजी मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात होणार आहे .श्रीसंत गजानन महाराज नगरी शेगाव संस्थांच्या घालून दिलेल्या नियमानुसार तसेच स्थानिक प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून यंदाची वारी वाहनाने होणार आहे. सदर वारीचे गेल्या दहा वर्षापासून सतत आयोजन केले जात असून यंदाच्या वारीचे हे अकरावे वर्ष आहे . या दिवशी सुरुवातीला मनवेल रोड वरील जोशीज् फार्मवरील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात पादुकांचा विधीवत अभिषेक व महाआरती करण्यात येईल. यानंतर मंदिरापासून साकळी गावाच्या श्री वाडेश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी वारी होणार आहे. दर वर्षाच्या प्रथेनुसार वारी मार्गात ठिक-ठिकाणी रांगोळ्या तसेच फुलांचा वर्षाव करीत महाराजांची आरती करत वारीचे स्वागत केले जाणार आहे. व वारीचे पुढील मार्गात प्रस्थान होईल.त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय प्रथेनुसार विविध अभंग गाऊन तसेच टाळ मृदंगच्या गजरात महाराजांचा जयघोष करून वारी मार्गस्थ होईल .अतिशय मंगलमय -प्रसन्नमय तसेच धार्मिक वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या वारीचे स्वरूप पाहून गावातील सर्व भाविक भक्तांना एक धार्मिक आत्मतृप्ती होत असल्याची अनुभूती येत असते .वारी दरम्यान भाविक- भक्त,ग्रामस्थांतर्फे भाविकांना ठिकठिकाणी नाश्ता, चहापाणी व बिस्किटांचे वाटप करण्यात येत असते .एकूणच साकळी ते शेगाव वारीला भाविकांचा प्रतिसाद पाहता हि वारी गावाचा धार्मिक वारसा बनली आहे.
●कोरोनाचे नियमांचे पालन होणार-कोरोना नियमांमुळे यंदाची वारी वाहनांव्दारे जाणार आहे, वारीत कोरोना नियमांचे पालन करावे. यात मास्क, सॅनीटायझरचा वापर करावा. वारीत एकसुत्रता दिसावी म्हणून पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट, नेहरु कुर्ता पायजमा (शक्यतो पांढरा, नसल्यास रंगीत चालेल) असा पेहराव करावा. डोक्यात पांढरी टोपी व तोंडावर मास्क सक्तीचा असेल.तसेच वारी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत शिस्तीने वारी यशस्वी करावी. असे आवाहन श्री संत गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, उपाध्यक्ष ईश्वर बडगुजर, कार्याध्यक्ष हर्षल बाविस्कर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.