चोपडा – येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात ‘जिजाऊ – सावित्री सन्मान सप्ताह’ अंतर्गत कर्तृत्ववान मातांचा सत्कार व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चोपडा येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्राजक्ता भामरे, शिक्षिका सौ. सुरेखा साळुंखे, आशा सेविका सौ. वैशाली चौधरी, सौ. कीर्ती पाटील यांचा कर्तृत्ववान माता म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर शिक्षक रवींद्र साळुंखे, एकनाथ पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक दीपक शुक्ल हे उपस्थित होते.
‘मासिक पाळी व लैंगिक शिक्षण’ या विषयावर डॉ. प्राजक्ता भामरे यांनी मार्गदर्शन केले. वाढत्या वयात होणारे शारीरिक, भावनिक, मानसिक बदल, वयानुसार बदलत्या जाणीवा, आरोग्याच्या सवयी, मासिक पाळीबद्दलचे समाज – गैरसमज, घ्यावयाची काळजी याविषयी संवाद साधला. विद्यार्थिनींच्या शंका व समस्यांना डॉ. प्राजक्ता भामरे यांनी उत्तरे देऊन समाधान केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आय. ए. एस. पदी निवड झालेल्या गौरव साळुंखे यांच्याया मातोश्री सौ. सुरेखा साळुंखे यांनी गौरवच्या वाटचालीबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्याच्या जडणघडणीतील प्रसंग विद्यार्थिनींना सांगितले. चौकस बुद्धी आणि वाचनाची सवय या बाबी आयुष्यात महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनराज महाले यांनी तर आभारप्रदर्शन सौ. यशोदा शिरसाठ यांनी केले. यशस्वीतेसाठी सौ. शीतल माळी यांनी सहकार्य केले.