जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने माजी जिल्हाध्यक्षांसह चौघांना प्रदेश काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपला सहकार्य केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, दोघांनी खुलासा न केल्यामुळे पुन्हा एकदा नोटीस काढली असून प्रदेशकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव रघुनाथ पाटील (रावेर), डी.जी.पाटील व अरुणा दिलीपराव पाटील (धरणगाव),विकास वाघ (पाचोरा) यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी केल्याने पक्षांतर्गत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजपला सहकार्य केल्याचा चौघांवर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाची प्रदेश कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्यात नोव्हेंबर महिन्यात चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर खुलासा मागवला असता म्हणणे सादर न केल्याने पुन्हा गेल्या आठवड्यात नोटीस काढण्यात आली आहे.त्यात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात भाजपच्या उमेदवारासोबत पॅनल तयार करून भाजपच्या सहकार्याने निवडणूक लढवली. तसेच माध्यमातून पक्षास बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला आहे.
या प्रकरणी प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून नोटीस बजावली आहे. त्यात सात दिवसांत खुलासा मागवला आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने चौघांविरुद्ध कारवाईचे संकेत मिळत आहे.