मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | क्रिकेट बेटिंग प्रकरणात बुकी सोनू जलानच्या विरोधात २०१७ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेशण विभाग कडून चौकशी सुरू असताना या प्रकरणाला एक नवे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी गुन्ह्यांशी संबधित व्यक्तींनाही चौकशीला बोलावले जात असताना, अचानक चिराग मजलानी या एका साक्षीदाराने पलटी मारली असून त्याने ठाणे पोलिसांवरच उलट गंभीर आरोप केला आहे.
सोनुवर क्रिकेट बेटिंग प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात चिराग मजलानी या साक्षीदाराने आता चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. चिराग मजलानीने आधी सोनू जालानविरोधात साक्ष दिली होती. आता त्याने पोलिस चौकशीत पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्याचा घेतलेला जबाब हा पोलिसांनीच लिहिला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोनू जालानने या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
सोनूने त्याच्याविरोधात क्रिकेट बेटिंगचा खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं म्हटलं होतं. या गुन्ह्याबाबत त्याने राज्याचे गृहमंत्री, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर ठिकाणी तक्रार नोंदवून दाद मागितली होती. आता हे नवीन वळण या प्रकरणात आले असून यात साक्षीदारानेच उलट आरोप करत ट्विस्ट निर्माण केला आहे.